मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा

परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. 

Updated: Sep 23, 2020, 05:56 PM IST
मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा   title=

मुंबई : परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचे पाणी शिरले. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पाहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यानंतर शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेय.

मुंबईत ३०० मिमी पाऊस झाला तर पाणी साठणार नाही का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर विरोधकांचे काम टीका करणे आहे, असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. मागील ४० वर्षांपासून मुंबईत १०० मिमी पाऊस झाला तरी काही भागात पाणी साठतेच, असे सत्ताधाऱ्यांनी म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळलेत.

मुंबईची पुन्हा एकदा पुरती दाणादाण 

 

संध्याकाळी ४.०० वा. 

एल्फिन्स्टन ब्रिज जवळ पाण्याचा निचराच न झाल्याने वाहतूक बंद होती. मुंबईकर सकाळपासून अर्ध्या वाटेतच खोळंबलेले पाहायला मिळाले. 

दुपारी २.०० वा. 

मुंबई सेट्रलच्या एसटी डेपोमध्येही पाणी साचल्यानं अनेक एसटी बसेस जागेवरच उभ्या होत्या.  

वरळीत अतिवृष्टीमुळे भिंत कोसळली. वरळीतील पोलीस कँम्प परिसरात ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

गिरगावमध्येही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. 

दुपारी ०१.०० वा. 

दरवर्षीच हिंदमाता परिरसरात पाऊस झाला की पाणी साचतंच. त्याप्रमाणे इथे अनेक दुकांनामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 

 दुपारी १२.०० वा. 

चेंबूर परिसरात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून जावं लागलं.

सकाळी ११.०० वा. 

दादर परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचलं. 
 
मुंबईत रात्रभर झालेल्या पावसाचा नायर हॉस्पिटलला फटका बसला. नायर रुग्णालयात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले. 

सकाळी १०.०० वा. 

मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका बसला. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रिशेड्यूल करण्यात आल्या. तर काही गाड्या आहे त्याच ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. 

सकाळी ९.०० वा. 

किंग्ज सर्कल या परिसरातही दरवर्षीच पाणी तुंबंत असतं. यंदाही या परिसरात पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात वाहनं अडकली होती. 

सकाळी  ८.३० वा. 

चिंचपोकळी परिसरातही कंबरेएवढं पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

सकाळी  ८.०० वा. 

शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचं पाणी शिरलं. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झालं होतं. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पहायला मिळालं. 

सकाळी ०७.३० वा. 

सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. 

सकाळी ०७.०० वा. 

सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. 

सकाळी ०६.३० वा. 

झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झालंय. या परिसरात लाईटही गेलीय.