Mumbai Coastal Road : भारतातला पहिला समुद्राखालचा बोगदा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातला हा समुद्राखालच्या बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचलाय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. मरीन ड्राईव्हे ते बांद्रा वरळी सीलिंक या टप्प्यातला हा जवळपास 3 किमी लांबीचा हा समुद्राखालचा बोगदा आहे. हे खोदकाम करण्यासाठी 35 मजूर आणि भलंमोठं चिनी बनावटीचं टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात आलं. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी आणि मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा कोस्टल रोड यावर्षी नोव्हेंबरपासून जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. केवळ काही काम होणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत बोगद्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या बोगद्याची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12 हजार 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे. यामध्ये दक्षिण भागाचे काम सुरु असून जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, मुंबई - अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बुलेट ट्रेनच्या प्रवासात मुंबई ते ठाणे दरम्यान पाण्याखालून प्रवास करता येणार आहे. वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असेल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर जवळपास 35 किलोमीटर इतके आहे. हा बोगदा पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागेल.
प्रस्तावित हाय-स्पीड बुलेट रेल्वे कॉरिडॉर मुंबईतील ठाणे खाडीतून जाणार आहे. हा भाग फ्लेमिंगो आणि जवळच्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक एका बोगद्याद्वारे समुद्राखालून तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा सर्वात लांब रेल्वे वाहतूक करणारा, तसेच भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असेल. हा बोगदा 13.2 मीटर रुंदीची सिंगल ट्यूब असेल. संबधित प्राधिकरणाने प्रकल्पासाठी पाण्याखालील सर्वेक्षण आधीच केले आहे.