मुंबई : मुंबईतील डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी कारवाईला सुरूवात झालीय. बीएमसीच्या बी वॉर्डचे मुख्य अधिकारी अर्थात वॉर्ड ऑफिसर विवेक राही यांना निलंबित करण्यात आलंय. डोंगरीच्या ज्या भागात ही इमारत कोसळली तो भाग मुंबई महानगरपालिकेच्या 'बी' वॉर्ड अंतर्गत येतो. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या आणखीन काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी निलंबनाची कारवाई केलीय.
मुंबईतल्या डोंगरीमध्ये केसर भाई ही चार मजली इमारत कोसळली. यात १३ जणांचा बळी गेला. यानंतर मुंबई महापालिका आणि म्हाडा ही इमारत आमची नाही असं म्हणून एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, मुंबईच्या डोंगरी परिसरातली केसरबाई इमारत महापालिकेची की म्हाडाची या वादावर महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ती इमारत म्हाडाचीच असल्यावर शिक्कामोर्तब केलंय. मालमत्ता पत्रावर म्हाडाचंच नाव असून मूळ केसरबाई इमारत आणि शेजारीच बांधलेल्या आणखी दोन इमारती मालमत्ता पत्रकात एकत्रित दाखवण्यात आल्या असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. इमारत दुर्घटनेवर बुधवारी स्थायी समितीत झालेल्या चर्चेला आयुक्त प्रवीण परदेशी यांनी उत्तर दिलं.