Weather update: दिल्लीमध्ये हवामान अचानक बदलल्याचं दिसून आलं. अशातच आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यात असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. याशिवाय राजधानी दिल्लीमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज आकाश ढगाळ राहणार आहे. या काळात कमाल तापमान 20 आणि किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
येत्या दोन दिवसांत दिल्लीत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नव्याने तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा दिल्लीच्या हवामानावर परिणाम होऊ शकतो. याचमुळे पुढच्या दोन दिवसांत हलका मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान 18.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. जे या सिझनच्या सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअस कमी आहे, तर दिवसभरातील आर्द्रता 100 ते 74 टक्के दरम्यान राहिलीये.
दिल्लीत शुक्रवारी ठिकाणी मध्यम आणि दाट धुकं दिसून आलं होतं. दरम्यान धुक्यामुळे विमानतळावरून येणाऱ्या आणि निघणाऱ्या विमानांना उशीर झाला. यावेळी तब्बल 300 हून विमानांच्या वेळेत बदल झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी 56 आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह 349 उड्डाणे उशीर झाली.
महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गारठा जाणवतोय. उत्तरेककडून पुण्याच्या दिशेने थंड वारे येत असल्याने पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात थंडी वाढणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील थंडी वाढणार आहे. तापमानातील हा बदल 5 ते 6 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात घट झाल्याचं दिसून येतंय. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे.