जेवताना घशात अडकलं चिकनचं हाड आणि...

डॉक्टरांच्या मते घशात हाड अडकल्यानंतर पेशंटचा जीव वाचणं २४ तासांनंतर कठीण असतं

Updated: May 23, 2018, 08:54 PM IST

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : नॉन-व्हेजप्रेमींनी चिकन-मटणावर ताव मारताना जरा दमानं घेतलेलंच बरं... कारण घाईने खाणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं...  मुंबईतील सगीर शहा चिकन खात होते. त्यावेळी घरातले लाईट गेले होते. खाताना सगीर यांच्या घशात चिकनचं हाड अडकलं. सगीर यांनी पूर्ण ताकदीने ते गिळण्याचा प्रयत्न केला, पण ते घशात आणखी अडकून बसलं. हे हाड तब्बल चार दिवस अडकून होतं. अन्ननलिकेचं दुखणं असह्य झालं. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी पाठवलं, तरीही दुखणं कायम होतं. अखेर  क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर साडे तीन सेंटीमीटर लांबीचा एल आकाराचा हाडाचा तुकडा काढण्यात आला. 

डॉक्टरांच्या मते घशात हाड अडकल्यानंतर पेशंटचा जीव वाचणं २४ तासांनंतर कठीण असतं. पण सगीर यांच्या घशातील हाड चौथ्या दिवशी काढण्यात आलं. ते आता धोक्याच्या बाहेर आहेत. 

त्यामुळे जेवण जेवताना सावकाश जेवा, चावून चावून जेवा... घाई केल्यास सगीर शहा यांच्यावर ओढवला तसा प्रसंगही ओढवू शकतो... त्यामुळे सावधान !