Maharashtra Politics : राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या (Thackeray Family Security) सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी, तसंच पायलटही कमी केलाय. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे.
राज्याच्या गृहविभागाने हा आदेश दिला आहे. आदेशानुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात कमी करण्यात आली आहे. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबांच्याच सुरक्षेत कमी केली आहे. अचानक सुरक्षा कमी करण्याबाबत गृहविभागाकडून कोणतंही कारण अद्याप देण्यात आलेलं नाही.
शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान ठाण्यातल्या लुंग्यासुंग्यांना सुरक्षा पुरवणा-या सरकारनं सुडापोटी उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हे सुडबुद्धीचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. शिंदे सरकारकडून ही कृती अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका पक्षप्रमुखाच्या सुरक्षेत कपात करुन मुख्यमंत्री स्वत:चा लौकीक कमी करत आहेत. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करुन सज्ज आहे, कितीही कुटनिती आणि सुडबुद्धीचं राजकारण त्यांनी केलं तरी आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
भाजपने काय म्हटलंय
सुषमा अंधारे यांच्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आपली सुरक्षाही कमी करण्यात आली होती, म्हणजे माझं खच्चीकरण करण्यात आलं होतं का असा सवाल मुनगंटीवार यांनी म्हटलंय. सुरक्षा समिती असते, ती आढावा घेत, यात रडण्यासारखं काय आहे, दुसऱ्यांची सुरक्षा कमी केलेली तेव्हा काही प्रश्न येत नव्हते का? असा सवाल मुनगंटीवर यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरेंच्या निकटवर्तींवर ईडीची धाड
दरम्यान, मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी ईडीने 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केलीय...ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणांच्या घरावरही ईडीने धाड टाकलीय...तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे...कोविड सेंटर बनवण्यासाठी सुजित पाटकरांनी यासाठी रातोरात कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे...या सर्व प्रकरणात संबंधितांवर छापेमारी करण्यात आलीय...