दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत. भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना केवळ ७३ मतांवर समाधान मानावं लागलं.
या निवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवसेना आमदारांनीही मतदान केलं. पण या निवडणुकीतून भाजपनं शिवसेनेलाही इशारा दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडे भाजपाची १२२, शिवसेनेची ६२, बहुजन विकास आघाडी ३ आणि अपक्ष ७ अशी १९४ मतं होती. म्हणजेच भाजपा उमेदवाराला १५ अधिक मतं मिळाली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाला २०८ मते मिळाली होती. यावेळी भाजपाने एक मत जास्त मिळाले.
शिवसेनेच्या वारंवार सत्तेतून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांनाही भाजपनं सुरुंग लावल्याचं या आकडेवारीतून दिसतंय. भविष्यात शिवसेनेनं जरी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर या २०९ मतांमधून शिवसेनेची ६२ मतं वजा केल्यावरही भाजपकडे १४७ मतं उरतात. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करायला भाजपला ही मतं पुरेशी आहेत.