Maharashtra Budget 2019: विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

Updated: Feb 27, 2019, 01:50 PM IST
Maharashtra Budget 2019: विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी title=

मुंबई : आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण त्याआधी विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी सुरु आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी विरोधक करत आहेत. तसेच 2018 खरीपापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ आणि दुष्काळी भागात पाणी, चारा उपलब्ध करून देण्याची मागणी विरोधक करत आहेत. दुपारी 1.30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता विधानसभेत सन 2019- 20 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

याआघी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता. राज्यपाल आरएसएसचे समर्थन करतात त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. गेल्या पाच वर्षांत राज्यपालांच्या अभिभाषणात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलेलं नाही. राज्यातील जनतेची या सरकारनं पाच वर्ष फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याआधी विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर देखील बहिष्कार घातला होता.
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक पाहता आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षभरात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा देखील अर्थसंकल्पात केला जाणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या कोरडवाहू आणि जिरायत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच रोजगाराबाबतही काही घोषणा होऊ शकतात. स्मारकांसाठी निधीची घोषणा होऊ शकते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दिशेने काही घोषणा होण्याची शक्यता आहे.