दक्षता ठसाळे-घोसाळकर, झी मीडिया, मुंबई : अभिनेता विक्की कौशल्यच्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'ची जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना 'सर्जिकल स्ट्राइक'मधून सडेतोड उत्तर दिलं. या सिनेमातून पुन्हा एकदा तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. देशभक्तीवर आधारित हा सिनेमा प्रत्येकामध्ये एक प्रकारचा 'Josh' निर्माण करत आहे.
आजची तरूणाई देखील यामधून प्रेरणा घेत आहे. पण हा तरूणाईचा 'Josh' अगदी काही दिवसांचा असेल आणि पुन्हा ही युवापिढी आपल्या मोबाइलमध्ये आणि गेम्समध्ये व्यस्त होतील असं साऱ्यांनाच वाटत असेल. पण असं असेलच असं नाही कांदिवलीच्या बालभारती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नयना रेगे यांनी विद्यार्थ्यांसमोर आणि समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
'१५ ऑगस्ट' किंवा '२६ जानेवारी'लाच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागी होती असा अनेकांचा समज असतो. पण प्राध्यापक रेगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली गोष्ट रूजवली आहे. विद्यार्थी शिक्षक समोर आले की, कधी आदराने तर कधी भीतिपोटी त्यांना हॅलो सर किंवा हॅलो मॅडम असं म्हणतात. पण हा नुसता दिखावा बाजूला सारून त्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा सकारात्मक विचार रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी शिक्षक समोर भेटल्यावर 'Hi' किंवा 'Hello' करून देखल्या देवा दंडवत करतात. पण यावर प्राध्यापक नयना रेगे यांनी एक नामी युक्ती लढवली. विद्यार्थ्यांनी रेगे मॅडम दिसल्यावर त्यांना 'जय हिंद' म्हणावं. पण तेही म्हणताना मनात I Love My Country, I Respect My Country आणि I am greatful to My Country असा भाव असणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर 'जय हिंद' म्हणताना उजवा हात डाव्या छातीवर ठेवून अगदी सैनिकाप्रमाणे 'जय हिंद' करावं.
गेल्या २० वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नयना रेगे प्राध्यापकांनी १० ते १२ वर्षांपासून हा नवा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये रूजवला. आणि आज त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की, विद्यार्थ्यांमध्ये रूजवलेलं हे छोटंस रोपटं आज बहरू लागलं आहे. विद्यार्थी फक्त महाविद्यालयाच्या आवारातच नाही तर कुठेही भेटल्यावर नयना रेगे यांना 'जय हिंद' बोलून संभाषणाला सुरूवात करतात. एवढंच काय तर ज्या विद्यार्थ्यांच शिक्षण पूर्ण झालं आहे ते विद्यार्थी देखील कुठेही भेटले तरी 'जय हिंद' म्हणतात. नयना रेगे यांनी सुरू केलेला हा विचार आता विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रूजला आहे. पालकांना तर शाळेतील इतर शिक्षकांना देखील या गोष्टीचा खूप आनंद असून अभिमान वाटतो.
देशाप्रती फक्त २ दिवसंच प्रेम आणि आदर व्यक्त न करता हा आदर मनात कायमच असावा या भावनेपोटी हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यात आला. आपल्या प्रत्येक कामातून देशाचं हित कसं राखलं जाईल हा विचार प्रा. नयना रेगे यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.