मुंबई : इतिहासकार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक सच्चा शिवभक्त, महान इतिहासकार आणि ज्यांनी छत्रपती शिवरायांना घरोघरी पोहचवलं आणि आपलं संपूर्ण जीवन हे महाराजांच्या चरणी अर्पण केलं. अशाप्रकारचं एक देशभक्त व्यक्तीमत्व आपल्यातून ऩिघून गेलं आहे'.
'नुकताच 100 व्या वर्षी पदार्पण केल्यामुळे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला होता. आणि त्यावेळी असं वाटलं होतं की, आणखी अनेक वर्ष त्यांच सानिध्य हे आपल्याला लाभेल. परंतू दुर्दवाने त्यांची प्रकृती ढासळली आणि ते आपल्यातून गेले.
पण, हा छत्रपतींचा सच्चा सेवक, ज्याप्रकारे त्यांनी गडकिल्ल्यांची सेवा केली. गडकिल्यांचं महत्व हे सामान्यांपर्यंत पोहचवलं. ज्याप्रकारे त्यांनी महाराजांचं महत्व लहान मुलांच्या मनावर रुजवलं. जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून आमच्या राजाची कारकिर्द किती वैश्विक होती हे अधोरेखित केलं.
अशाप्रकारच्या शिवभक्ताचं, राष्ट्रभक्तांचं आपल्यातून जाणं हे पोकळी निर्माण करणारं आहे. की जी कधीही भरून निघणार नाही. मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ' अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.