मुंबई : After the Shiv Sena rally, BJP's answer rally in Mumbai today : शिवसेनेच्या सभेनंतर मुंबईत आज भाजपची उत्तर सभा होणार आहे. उत्तर भारतीय युवा मोर्चाच्यावतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस करारा जबाब देणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. ही टीका भाजप आणि संघाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे जोरदार प्रत्युत्तर येणार असे संकेत मिळत होते. आता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम...अरे छट हा तर निघाला...आणखी एक ‘टोमणे बॉम्ब’... जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!! असे म्हणत भाजप जोरदार प्रत्युत्तर देणार याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते या सभेत काय बोलणार याची उत्सुकता आहे. (BJP Leader Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray by tweeting)
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर परखड टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा देखील उद्धव ठाकरे यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिले. आता फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. कालच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व खोटं असल्याचं उघड झाल्याचं पूर्ण महाराष्ट्राला कळलं असल्याची, टीका सोमय्यांनी केली. तर ठाकरेंनीही मनीलॉंड्रींग केल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला.