सोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण

सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे

Updated: Nov 27, 2019, 10:06 PM IST
सोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण title=

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे विशेष निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठलंय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत सोनियांना प्रत्यक्ष भेटून गुरुवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. गुरुवारी उद्धव ठाकरे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची उपस्थिती निश्चित मानली जात होती. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबतचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना दिल्ली गाठलीय. 

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरें थेट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दालनात हजर झाले. इथं त्यांनी मनमोहन सिंग यांनाही उद्धव ठाकरेंच्या  शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं.

 

ठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद

सध्या मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण धाडण्यात आले आहे. उद्धव यांचा शपथविधी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर खास सेट उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पुन्हा २४ वर्षांनी शिवतीर्थावर 'त्या' ऐतिहासिक क्षणाची पुनरावृत्ती

शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे व्यासपीठ तयार केले जात आहे. याच जागेवर दरवर्षी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावाही होत असतो. त्यासाठी सहा हजार फुटांचे भव्य व्यासपीठ उभारले जाईल. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात २० एलईडी लावले जाणार आहेत.