किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : नाशिकमध्ये सासऱ्याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघड झालीय. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे हा नराधम सासरा राजकीय पदाधिकारी आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात ही धक्कादायक तक्रार दाखल झालीय. राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या एका स्थानिक नेत्याने आपल्या सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. राहत्या घरात आणि इनोव्हा कारमध्ये त्याने हे कुकर्म केलं.
आरोपीला अटक करून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सासरा, पती आणि सासूवरही बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, धमकावण्याचा गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी दिलीय.
हा प्रकार उघड न करण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. अखेर सुनेने तक्रार नोंदवली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडालीय.