Nitin Gadkari In Nagpur Contituency : भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना नागपूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरींनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गडकरींना नागपुरातून (Nagpur Contituency) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसने विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांना रिंगणात उतरवलं असल्याने आता निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं चित्र समोर येतंय. अशातच आता एका प्रचार सभेत बोलताना नितिन गडकरींनी त्यांच्या राजकीय वारसदारावर मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले नितिन गडकरी?
माझा एकही मुलगा राजकारणात नाही. मी त्यांना सांगितलंय की, तुम्ही माझ्या पुण्याईवर राजकारणात येऊ नका. तुम्हाला जर राजकारणात यायचंच असेल, तर तुम्ही तुमच्या हिंमतीवर या... पोस्टर चिटकवा, भिंती रंगवा आणि जनतेत जा... माझ्या जो वारसा आहे त्यावर आणि मी केलेल्या कामांवर जर कुणाचा अधिकार असेल तर तो भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे, असं नितिन गडकरी म्हणाले आहेत. यावेळेस प्रत्येक बुथवर 75 टक्के मतदान व्हायला पाहिजे. तुम्ही मतदारांना जेवण द्या पण दारू नको, अशा सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहे, नागपुरात एका कार्यक्रमात नितिन गडकरी बोलत होते.
मी नागपूरला 24 तास पाणी देण्याचं स्वप्न पाहिले होतं. आता 70 टक्के जनतेला 24 तास पाणी मिळत आहे. तर झोपडपट्टी भागात देखील ड्रम ठेवण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे आता आगामी 25 वर्ष नागपूरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, असंही गडकरी म्हणाले आहेत. मी नागपूरची निवडणूक जिंकलो नसतो तर देशभरात काम करू शकलो नसतो, असंही गडकरी म्हणाले आहेत.
नागपूरचं राजकीय गणित
2009 मध्ये मुत्तेमवारांनी भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहितांना २४ हजार मतांनी हरवलं. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत फासे पलटले. नितीन गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी मुत्तेमवारांना तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये पुन्हा एकदा गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंना 2 लाखांहून अधिक मताधिक्यानं धूळ चारली. विधानसभा मतदारसंघावर नजर टाकली तर नागपूरमधून भाजपचे 4 आमदार निवडून आलेत. तर नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे 2 आमदार विजयी झालेत. आता नितीन गडकरी विजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झालेत.