Viral Video : नुकताच जागितक महिला दिन (world women's day) होऊन गेलाय. जगभरात मोठ्या उत्साहात हा महिला दिन साजरा करण्यात आलाय. महिलांना (women) कमी लेखण्याचे दिवस कधीच निघून गेलेत हेच एकाअर्थी सांगणारा हा दिवस आहे. त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या तितक्याच बरोबरीने काम करतेय हेच सत्य आहे. मात्र आपुलकीची भावना प्रत्येकाच्या मनात असते आणि तिथे स्त्री आणि पुरुष असा अपवाद नसतो. अशाच एका कर्तव्यासाठी निघालेल्या आईचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
कोल्हापुरच्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये दाखल होण्यासाठी निघालेल्या असताना त्यांचे कुटुंब त्यांनी सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र वर्षाराणी यांना निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर झालेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वर्षाराणी यांना 10 महिन्यांचा मुलगा असून त्याला सोडून कर्तव्यावर जाताना त्यांच्या जीवाची घालमेल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ज्ञानेश्वर साळोखे नावाच्या फेसबुक यूजरने याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. "डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ. आई होणे एवढं सोपं नसत,खूप काही त्याग करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या दहा महिन्याच्या मुलाला घरी सोडुन बीएसएफ मध्ये दाखल झाल्या.रेल्वे स्टेशनवरून ड्युटी वर हजर होताना त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल झाली.आईपण बाजूला ठेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी ती निघून गेली.या हृदयस्पर्शी व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं," असे ज्ञानेश्वर साळोखे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये वर्षाराणी पाटील कर्तव्यावर निघण्याआधी सगळ्यांची भेट घेताना दिसत आहेत. यावेळी वर्षाराणी यांचे नातेवाईकांनाही यांनी अश्रू अनावर झालेत. वर्षाराणी सगळ्यांची गळाभेट घेत आहे. मात्र त्यांचे पती मोठ्या धीराने त्यांना तू काळजी करु नकोस असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दहा महिन्यांचा चिमुकल्याला सोडून जाताना एका आईची होणारी घालमेल डोळ्यात पाणी आणणारी आहे. शेवटी ट्रेन निघाल्यानंतर निरोप देताना वर्षाराणी यांचे अश्रू थांबत नव्हेत. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत.
"जेव्हा जीवनाने मला समजले तेव्हा मृत्यू म्हणजे काय देशा तूच मला सांग तुझ्यापेक्षा मोठे काय आहे," असा संदेश देखील व्हिडीओच्या शेवटी देण्यात आला आहे.