नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे: बेशिस्त वर्तन आणि उद्धट वागणाऱ्या पोलिसांना सुधारण्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. काय आहे हा प्रयत्न घ्या जाणून. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या आवारात एक राहुटी उभारली होती. यामध्ये असलेल्या लाल रंगाच्या खुर्च्या अशा बेशिस्त पोलिसांना बसण्यासाठी दिल्या होत्या. या खुर्चीवर बसलेल्या पोलिसांना दिवसभर कुठलेही काम न सांगता दर तासाला त्यांची सही घेऊन हजेरी घेतली जात होती. येणाऱ्या-जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त सँल्युट ठोकणं, ऐवढंच काम त्यांना करावं लागत होतं. पण माध्यमांमध्ये या उपक्रमाची चर्चा झाल्यानंतर ही राहुटी काढून टाकण्यात आली आहे.
पोलिसांना शिस्त लावणाऱ्या डिसिप्लिन स्कॉडसाठी हे करण्यात आलं होतं. कामावर वेळेत न येणे, सामान्य जनतेशी उध्दट वर्तन, सहका-यांशी बेशिस्त वर्तन, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना योग्य वागणूक न देणा-या पोलिसांना शिस्त लावण्यासाठी डिसिप्लिन स्कॉड तयार करण्यात आले असून, गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
"डिसीप्लीन स्कॉड"च्या दुस-या पथकात आठ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. आतापर्यंत पोलीस इतरांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षा करताना आपण पाहिलं होतं. आता पोलिसांसाठीच्या या शिक्षेचा अनेक पोलिसांनी धसका घेतलाय, पण शिक्षेचा धसका घेण्यापेक्षा धडा घेणं जास्त महत्त्वाचं आहे.