'डम्पिंग ग्राउंडच्या आसपास...', राऊतांनी राज ठाकरेंना दिला 'इथे' घर घेऊन राहण्याचा सल्ला; कारण...

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut on  Raj Thackeray: राज ठाकरेंनी 8 तारखेला या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती त्याच मतदारसंघात आज त्यांची तोफ पुन्हा धडधडणार असून यासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 12, 2024, 03:01 PM IST
'डम्पिंग ग्राउंडच्या आसपास...', राऊतांनी राज ठाकरेंना दिला 'इथे' घर घेऊन राहण्याचा सल्ला; कारण... title=
पत्रकारांशी बोलताना लगावला टोला

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut on  Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज विक्रोळीमध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी विक्रोळीमध्ये सभा घेतली असून आज होणारी सभा ही राज यांनी या मतदारसंघातील दुसरी सभा होणार आहे. याबद्दलच पत्रकारांनी विचारलं असता राऊत यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. 

राज ठाकरेंच्या आज कुठे कुठे सभा?

राज ठाकरे आज मुंबईतील चांदिवली, भांडुप आणि विक्रोळी अशा तीन ठिकाणी सबा घेणार आहेत. चांदिवली येथे राज यांची सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये ते माधुरी हॉटेल व गुरुदेव मेडिकल, साईबाबा मंदिर मार्ग, मोहिली व्हिलेज, पाईप लाईन, साकीनाका या भागातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे भांडूपमध्ये सभा घेतील. या सभेमध्ये ते सायंकाळी साडेसहा वाजता 90 फिट रोड, खडी मशीन या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. रात्री आठ वाजता राज ठाकरे विक्रोळीतील कन्नमवार बस डेपो जवळ, बिल्डिंग 139, विक्रोळी पूर्व येथे तिसरी सभा घेतील.

यापूर्वी राज ठाकरेंनी मागील आठवड्यामध्ये विक्रोळीतच सभा घेतली होती. या मतदारसंघामध्ये विक्रोळी विधानसभेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांच्या प्रचारार्थ राज यांनी आधी 8 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेतलेली. त्यामुळे ही राज यांनी विक्रोळीतील दुसरी सभा ठरणार आहे. या मतदारसंघातून संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

दोन सभा घेतात याचा अर्थ

"विक्रोळीत राज ठाकरेंना दोन दोन सभा घ्याव्या लागत आहेत," असं म्हणत राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच संजय राऊत यांनी, "तरी येणार आमची शिवसेनाच. विक्रोळीत कोणाला दोन दोन सभा घ्याव्या लागत असल्या तर याचा अर्थ त्यांचा पक्ष इथे कमजोर आहे. त्यांनी दोन सभा घेतल्या तरी येणार सुनिल राऊतच, सगळ्यांनाच माहिती आहे," असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'

घर घेऊन राहा

पुढे बोलताना राऊत यांनी राज ठाकरेंना आपल्या खास शैलीत टोला लगावला. "दोन सभा काय त्यांनी इथे घर घेऊन राहिलं पाहिजे. जसं नरेंद्र मोदी, अमित शाह महाराष्ट्रात मुक्कामाला आहेत. तसं काही नेत्यांनी विक्रोळीत, कांजूर मार्ग, डम्पिंग ग्राउंडच्या आसपास जागा रिकाम्या आहेत तिथे येऊन रहावं. मला काही अडचण नाही. ही लोकशाही आहे. कोणी कुठे किती सभा घ्याव्यात यावर काही निर्बंध नाहीत. घ्या सभा घ्या. आमच्यावर टीका करा. कारण ती देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की आमच्यावर टीका करावी. ही स्क्रीप्ट गुजरातवरुन आलेली आहे," असा टोला ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी लगावला.