पतंगीचा मांजा गळ्याशी, येणार संक्रात

नाशिकमध्ये दोन घटना, थोडक्यात वाचले दोघांचे प्राण 

Updated: Dec 31, 2021, 10:02 AM IST
पतंगीचा मांजा गळ्याशी, येणार संक्रात  title=

14 जानेवारी हा दिवस संक्रात म्हणून साजरा केला जातो. यादिवशी संपूर्ण राज्यात पतंग उडून हा उत्सव साजरा केला जातो. पतंग उडविताना स्पर्धा लागलेली असते. पतंग कापली जाऊ नये या करिता चांगला मांजा वापरला जातो. काही लोक नायलॉन मांजा वापरतात. या नायलॉन मांजामुळे आता पर्यंत अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर काहीना जीव गमवावा लागला आहे. यात प्राणी आणि पक्षांचाही समावेश आहे.

याच नायलॉन मांजामुळे नाशिक शहरात दोन जण जखमी झाले आहेत. चार दिवसात नाशिकच्या सातपूर परिसरात दोन घटना घडल्या आहेत.

अनुष्का पवार हि सातपूराच्या पपया नर्सरी जवळ राहायला आहे.  काही कामा निमित्त ती श्रीकृष्ण नगर मध्ये जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रस्त्यावर अचानक एक मांजा तिच्या गळ्याभोवती आला. या मांजाने अनुष्काचा गळा कापला गेलाय. मात्र तिच्या प्रसंगावधानाने ती थोडक्यात वाचलीय.

दुसरी घटना रविवारी (२६ डिसेंबर) ला घडलीय. राधाकृष्ण नगर येथे राहणारे उत्तम साळवे मुलीच्या लग्नाकरिता लागणारा सामान खरेदी करण्याकरिता बाजारात गेले होते. समृद्धी नगर येथून जात असताना नायलॉन मांजाने साळवे यांचा गळा कापला. यात ते जखमी झाले होते. मात्र त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचलाय.

नायलॉन मांजा संपूर्ण राज्यात छुप्या पद्धतीन सर्रास विकला जात आहे. त्याचेच हे एक उदाहरण म्हणायला हरकत नाही. या नायलॉन मांज्याने दर वर्षी अनेक अपघात होतात. यात काहीना जीव गमवावा लागला आहे तर काहींचे जीव वाचले आहेत. प्रशासनाने बंदी घालूनही नायलॉन मांजा विकला जात आहे. आता गरज आहे ती नागरिकांनी  नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याची.