मुंबई : घोटी सिन्नर महामार्गावर सकाळी परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. भिवंडीकडून ओरिसाकडे ५३ प्रवाशांना घेऊन हा ट्रक जात होता. ट्रक अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घोटी सिन्नर हायवेवर कॉलनी फाटा परिसरात हा अपघात घडला. या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला आहे. या कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये असे साधारण दोन लाख रुपये भाडे ट्रक मालकाने आकारले होते. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे मजुरांची प्रचंड प्रमाणात गैरसोय झाली आहे.
अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक पसार झाला असून क्लिनरला मजुरांनी पकडून ठेवलं आहे. नाशिक रोडवरील पिंपळ गावाजवळ अपघात झाल्यानंतर गावातील सरपंचांनी या मजुरांना मदत केली आहे. मजुरांना न्याहारी आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ट्रकचा अपघात झाल्यामुळे आणि सोबतचे पैसे ट्रक मालकाला दिल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे. (हृदयद्रावक घटना, पायी जाणाऱ्या सहा मजुरांना बसने चिरडले)
अचानक झालेल्या या लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल झाले. काम नसल्याकारणाने उपासमारीची वेळ या मजुरांवर आली. यामुळे आपल्या गावी जाण्याचा निर्णय मजुरांनी घेतला. मात्र जाण्यासाठी कोणतंही साधन नसल्यामुळे पायपीट करत मजुर गावी जाताना दिसतात. या मजुरांनी आपल्याकडे असलेले काही पैसे एकत्र करून ट्रकने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यावर काळाने घाला केला.
काही दिवसांपूर्वी ठाणे-नाशिक रोडवर एका तीनचाकी टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात ट्रेक चालकाचा मृत्यू झाला. ट्रक चालक आपलं कुटूंब आणि नातेवाईकांसह गावी जात होता. आपल्याकडे असलेल्या काही मोजक्या पैशांनी या टेम्पोत डिझेल भरलं आणि आपल्या गावी जाण्याचा प्रवास सुरू केला. मात्र एका अपघतात त्या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आणि त्या मजुरांचा प्रवास काही काळ तिथेच थांबला.