अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. याच दिवशी सोलापूरमध्ये (Solapur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापुरात ईदगाह मैदानजवळ पाकिस्ताचा झेंडा आणि LOVE PAKISTAN लिहलेले फुगे (Balloons) विकले जात होते. बकरी ईद निमित्त नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाच्या लक्षात येताच फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. फुगे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने हे फुगे कुठून आणले यासंदर्भात चौकशी सुरु आहे. ईदच्या दिवशी पाकिस्तान विषयी प्रेम दर्शवणारे फुगे विक्रीसाठी आणून काहीजणं समाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे फुगे बाजारात कसे आले, कुणी तयार केले आणि होलसेल विक्री ज्यांनी केली या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएम वाहतुक आघाडीचे शहाराध्यक्ष रियाज सय्यद यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येत असतात. यावेळी एक फुगेवाला लव्ह पाकिस्तान असे छापलेले फुगे विकत असल्याचं काही जणांच्या लक्षात आलं. मुस्लीम बांधवांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देत त्या फुगेवाल्याला पकडून दिलं.
हा फुगेवाला अशिक्षित आहे. त्यामुळे त्याला कोणते फुगे विकत आहोत याची कल्पना नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिलीय, पण या फुगे विक्रेत्याला हे फुगे कोणी दिले, कोणत्या होलसेल विक्रेत्यांकडून त्याने हे फुगे विकत घेतले याची आता पोलीस चौकशी करत आहेत. आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमने केली आहे. हा प्रकार गंभीर आहे. ईदच्या दिवशी पालक आपल्या लहान मुलांना घेऊन येतात. मुलं फुगे घेण्याचा हट्ट करतात. अशात लव्ह पाकिस्तान असं लिहिलेले फुगे लहान मुलं विकत घेत असतील तर हा धक्कादायक प्रकार असल्याचं बोललं जातंय.
समाजात कोण तेढ निर्माण करतंय?
काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) संदल उरुसच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या (Aurangzeb) फोटोचे फलक झळकवल्यांतर मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा देखील दाखल केला होता. ते प्रकरण शांत होत नाही तोच कोल्हापुरातही (kolhapur) औरंगजेबाच्या स्टेटसवरुन मोठा वाद उफाळून आला. या सर्व प्रकारानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. यादरम्यानही वाद झाल्याने पोलिसांना (kolhapur Police) लाठीचार्ज करावा लागला.