सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या समुद्रात होणारी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक थेट समुद्रात उतरले. सिंधुदुर्गातल्या मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी गेले काही दिवस सातत्याने सुरुच आहे. परराज्यातल्या या हायस्पीड ट्रॉलर, मासळीची लूट करत पारंपरिक मच्छीमारांची जाळीही तोडून नेत आहेत.
रात्रीच्या वेळी शेकडोंच्या संख्येने हे ट्रॉलर घुसखोरी करत असूनही महाराष्ट्राचा मत्स्य विभाग मात्र त्याविरोधात कारवाई करायला हतबल ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक स्वतः रात्री उशीरा मालवणमधल्या समुद्रात मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेतून मत्स्य अधिकाऱ्यांसोबत समुद्रात उतरले आणि घुसखोरी करणाऱ्या हायस्पीड बोटींवर कारवाईसाठी पाठलागही केला.
यावेळी त्यांना १५ ते २० हायस्पीड ट्रॉलर अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळले. मात्र पोलीस आणि अधिकाऱ्यांना बघून काही ट्रॉलर पळून गेले, तर गुजरातच्या तीन ट्रॉलरना यावेळी पकडण्यात आले.