औरंगाबाद: गुरुपौर्णिमा उत्सवात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी ६ कोटी ६६ लाख रुपयांचं दान प्राप्त झालंय. या गुरुपौर्णिमा उत्सवात तीन लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. या चार दिवसांच्या उत्सव काळातील दानाची मोजदाद करण्यात आलीय. साई मंदिर परिसरातील देणगी काऊंटरवर १ कोटी ५७ लाख ७२ हजार रुपये, हुंडीत ३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये प्राप्त झालेत. जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा साईभक्तांनी ऑनलाईन तसंच चेक आणि डीडीच्या माध्यमातून देणगी दिलीय.
दरम्यान,विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा काळात २ कोटी ९० लाख ४४ हजार रूपयांचं उत्पन्न जमा झालंय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २२ लाखांची वाढ झालीय. यावर्षीच्या यात्रा काळात ७ लाख भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतलं तर ११ लाख भाविकांना मुखदर्शनाचा लाभ मिळाला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिलीय.
दरम्यान, श्री विठ्ठलाच्या पायावर ३६ लाख ३७ हजार ५०९ रूपयांची देणगी मिळाली. श्री रूक्मिणी मातेच्या चरणी ६ लाख ९३ हजार ६२४ रूपयांची देणगी मिळाली... देणगी पावतीमधून १ कोटी ६० लाख १२ हजार ५५० रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून ५ लाख ३८ हजार ४७० रूपये, राजगीरा लाडू प्रसाद विक्री मधून ५ लाख ६४ हजार ५०० रूपये, फोटो विक्रीतून ९५ हजार ४७५ रूपये अशा देणग्यांचा यामध्ये समावेश आहे.