ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन

ख्यातनाम संगीतकार विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले.  

Updated: May 22, 2021, 11:51 AM IST
ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन title=
सौजन्य : सोशल मीडिया

नागपूर : ख्यातनाम संगीतकार विजय पाटील यांचे नागपूर येथे निधन झाले. नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार विजय पाटील यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. ( Senior musician Vijay Patil passed away at Nagpur) ते आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे. 

राम कदम उपाख्य राम आणि विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. 1976 मध्ये आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे. 

राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी किर्ती मिळवली, विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल 92 चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी सुपरहिट गाणी दिली.

हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. इथपर्यत उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली. 1989 च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान माधुरी दीक्षित अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर या ऑर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे ऑर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय आणि फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.