'नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या...' उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

महाराष्ट्रातला शेतकरी वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीवाऱ्या करतात, त्यांना कोणाची पर्वा नाही, उद्धव ठाकरे यांची टीका

Updated: Dec 26, 2022, 02:51 PM IST
'नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या...' उद्धव ठाकरेंची बोचरी टीका title=

Maharashtra Politics: कर्नाटक सीमावादप्रकरणी (Maharashtra-Karnataka Border Dispute) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले.. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad) थेट पेन ड्राईव्हच (Pen Drive) सादर केला. सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली. उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत आक्रमकरित्या सीमाप्रश्न मांडला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे 
गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद, हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे, दोन्ही राज्य संयमाने वागलं पाहिजे, पण कर्नाटक सरकार संयमाने वागत नाहीए, मराठी भाषिकांवर अन्याय सुरु आहे. विधानसभेत एक पेन ड्राईव्ह दिला आहे. या पेन ड्राईव्ह मध्ये 70च्या दशकात शरद पवार यांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली आहे 'केस फॉर जस्टीस'. या फिल्ममध्ये साधारण 18 व्या शतकातीलही पुरावे आहेत, सीमाभागात मराठी भाषा वापरली जात आहे.  सर्व गोष्टी फिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. एक पुस्तकही दिलं आहे. जो पर्यंत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासीत झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
शेतकरी उघड्यावर सोडलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) दिल्लीवाऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्री हे हिंदुत्व माणनारे आहेत, त्यामुळे ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं, याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं, आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊद्या म्हणून नवस करतोय, यासाठी त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत, यात महाराष्ट्राचं भलं कुठे आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आजही मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. पण इतक्या दिल्लीवारीमध्ये महाराष्ट्राचा मुद्दा कुठे आला आहे. सरकार अनैतिक असल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे कुठे झाले आहेत, कुठे मदत  दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रश्नावर विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याची टीका केली आहे.