Maharashtra Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Express Way) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. उद्घाटनला चोवीस तास उलटत नाहीत तोच काल समृद्धी महामार्गावर पहिला अपघात (Accident) झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या कारने पुढच्या कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आज पुन्हा एक घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. ब्रिजखाली ट्रक अडकल्याने बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.
शिर्डी इंटरचेंजवर ब्रिजखाली अडकला ट्रक
नगर मनमाड महामार्गावर शिर्डी इंटरचेंजवर (Shirdi Interchange) समृद्धी महामार्गाच्या ब्रिजखाली एक अवजड वाहन अडकलं. त्यामुळे चालकाची चांगलीच तारांबळ उडाली. समृद्धी महामार्गाच्या ब्रिजची उंची कमी आहे. त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील शिर्डी इंटरचेंजजवळ चेन्नईहून ऑईल रिफायनरीचे मशीन घेउन धुळ्याच्या दिशेने जात असलेला ट्रक ट्रेलर ब्रिजखाली अडकला.त्यामुळे ट्रक चालकाला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागंल. रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना चालकांनी संपर्क केला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नसल्याचे ट्रक चालक मोहम्मद अली याचं म्हणणं आहे.
समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना या पुलाची जास्तीत जास्त उंची ठेवण्याची गरज होती, मात्र रस्त्यापासून पुलाची उंची कमी असल्याने मोठ्या मशिनची वाहतूक करणारी वाहने इथं अडकून पडत असून वाहनधारकांचे हाल होत आहेत.
काल कारचा अपघात
समृद्धी महामार्गावर काल दुपारी पहिल्या अपघाताची नोंद झाली, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन केलं होतं, उद्घानाला 24 तास उलटत नाहीत तोच त्याच ठिकाणी अपघात झाला.
समृद्धी महामार्गाचा 24 जिल्ह्यांना लाभ
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.