Kolhapur memorial in Poland : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर आगहेत. पोलंडची राजधानी वॉर्सा येथे तब्बल 45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा झाला. पंतप्रधान मोदी पोलंडचे अध्यक्ष अँड्रेझ सेबास्टियन डुडा यांची भेट घेतली. पोलंडला भेट दिली असताना वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट देऊन अभिवादन केलं. त्याविषयी मोदींनी मराठीत ट्विट करत माहिती दिली. मात्र, पोलंडमधील कोल्हापूर स्मारक आहे तरी काय? याचा नेमका किस्सा काय आहे? यावर संभाजीराजे यांनी ऐतिहासिक गोष्ट सांगितली.
वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिलं. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं होतं.
मोदींच्या ट्विटनंतर संभाजीराजे यांनी या विषयावर प्रकाश टाकला अन् वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाची गोष्ट सांगितली. दुसऱ्या महायुद्धात पोलंड देशावर पराजयाचे ढग दाटले असताना कोल्हापूर संस्थानाने पोलिश नागरिकांचं रक्षण केलं होतं. त्याचा किस्सा संभाजीराजे यांनी सांगितला.
हिटलरच्या अमानुष नरसंहारमुळे अनेक पोलिश नागरिकांना आपला देश सोडावा लागला. हिटलरच्या भीतीने जगातील बहुतांश सर्वच देशांनी पोलिश नागरिकांना आश्रयाचे दरवाजे बंद केले होते. अगदी इंग्रजांनीही मदत नाकारली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालत छत्रपती घराण्याने या निर्वासित पोलिश नागरिकांना कोल्हापूरात निवारा दिला. वळीवडे येथे वसाहत बनवून पाच हजारहून अधिक पोलिश नागरिकांच्या राहण्याची सोय केली. १९४२ ते १९४८ अशी सात वर्षे हे नागरिक इथे कुटुंबाप्रमाणे राहिले. छत्रपती घराणे व कोल्हापूरच्या जनतेनेही त्यांना निर्वासित न मानता कुटुंबासारखे प्रेम दिले. पोलिश नागरिक आजही हे प्रेम विसरले नाहीत. त्यांनी युद्ध प्रसंगात ठामपणे पाठीशी राहिलेल्या कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे स्मारक पोलंडच्या राजधानीत साकारले आहे. दोन वर्षांपूर्वी याठिकाणी पोलंड सरकारने कृतज्ञता कार्यक्रम आयोजित केला होता व त्यासाठी मला मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूर छत्रपती घराण्याच्या स्मृती जागविल्या, हि निश्चितच समाधानाची बाब आहे. भारत आणि पोलंडचे राजनैतिक संबंध जोपासण्यासाठी मी माझ्या राज्यसभा कार्यकाळात सदैव प्रयत्नशील होतो व पुढेही राहीन, असा शब्द संभाजीराजे यांनी दिलाय.