Pune Metro : राज्यभरात गणेशोत्सवाटी धुम पहायला मिळत आहे. पुण्यातही गणेशोत्सवाचा मोेठा जल्लोष असतो. गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गणेश भक्तांसाठी पुणे मेट्रोने खास सोय केली आहे. विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा 24 तास सुरु राहणार आहे. यामुळे पुणेकरांना रात्रभर गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
पुण्यातील मानाचे पाचही गणपती विराजमान झाले आहेत.. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आणि तोच मानाचा पहिला गणपती.. श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे .. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. पुणेकर आवर्जून या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. रात्रीच्या वेळेस दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भक्तांसाठी पुणे मेट्रोने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये धावते. मात्र आता गणेशोत्सव काळात पहिल्या 3 दिवसांमध्ये म्हणजेच 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. त्यानंतर उत्सवाचे पुढचे 3 दिवस मेट्रो सेवा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत ही सुरु असणार आहे. सलग 24 तास पुणे मेट्रो धावणार आहे. 18 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. प्रवाशांच्या सोईनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.