बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 14, 2024, 07:24 PM IST
बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई title=

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या शोध मोहिमेला यश आलंय. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने (Pune Crime Branch) ही कारवाई केलीय. उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) प्रयाग इथून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून बलात्कार प्रकरणातील (Bopdev Ghat Gang Rape) हा प्रमुख आरोपी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलिसांनी नागपूर, अलाहाबाद, प्रयागराज असा शोध घेत अखेर उत्तर प्रदेशमधून आरोपीला ताब्यात घेतलं. आहे. याआधी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी केलं होतं स्केच जारी
बोपदेव घाट प्रकरणानंतर एका सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले होतं. हे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं. येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्या आधारवर पोलिसांनी आरोपींचं स्केच जारी केलं आणि नागरिकांना ते आरोपींना माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. या आधारावर दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

तिन्ही आरोपी परप्रांतिय
सुरुवातीला ताब्यात घेतलेला आरोपी हा पुण्यातील उंड्री परिसरातील आहे. तीन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर एकावर बलात्काराचा गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच तिघेही परप्रांतीय असून, गुन्ह्यापूर्वी ते बियर प्यायल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलीय. या प्रकरणातील आरोपी अतिशय सराईत असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. कोणताच पुरावा मागे ठेवायचा नाही अशा पद्धतीने त्यांनी गुन्हा केला. पण तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. आता या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.

काय होतं प्रकरण
पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी पुण्यातील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्या मुलीला तिथेच टाकून ते फरार झाले. घाटात ही घटना घडल्याने आरोपींबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती.