जावेद मुलाणी, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या सुमारे 300 फूट खोल बोगद्यात पडलेल्या दोन शेतकऱ्यांचे मृतदेह अखेर सापडले आहेत. बोगद्यात उतरलेल्या बचाव पथकाने रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र बऱ्याच वेळाच्या शोधानंतर दोन्ही शेतकऱ्यांचे मृतदेह अखेर हाती लागले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात दोन शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली होती. या दोघांचा ही रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता. अखेर रात्री पावणेबाराच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरुटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत.
मराठवाड्याच्या सात टीएमसी पाण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा जलस्थिरीकरणाच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या बोगद्यात पडून ही दुर्दैवी घटना घडलीय. काझड गावच्या हद्दीत नदी जोड प्रकल्प अंतर्गत चालू असलेल्या बोगद्याचे कामाचे ठिकाणी पाणी क्रेनच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते. यावेळी क्रेन तुटली आणि रतिलाल नरुटे व अनिल नरूटे हे दोघेही बोगद्यामध्ये कोसळले गेले. हे दोघेही साधारण 274 फूटांवरुन खोल बोगद्यात कोसळले होते.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या घटनेची माहिती दिली. 'नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. परिसरात राहणारे शेतकरी बोगद्यात पंप टाकून शेतीसाठी पाणी काढतात. दोन शेतकरी त्यांनीच बनवलेल्या ट्रॅक्टर-माऊंट क्रेनचा वापर करून पंप बसवण्यासाठी पाणी जात असताना क्रेन तुटली आणि दोघे बोगद्यात पडले. हा अपघात सायंकाळी 5.30 च्या सुमारास झाला, असे तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकडी कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ओपन स्पेसमधून हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते. पंपामधून पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे तिथे गेले होते. बऱ्याच वेळानंतरही दोघेही घरी परतले नाहीत. त्यावेळी नातेवाईकांसह स्थानिकांनी घटनास्थळ गाठले आणि त्यांचा शोध सुरु केला. मात्र घटनास्थळी दोघांची बाईक सापडल्याने काहीतरी घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक शोधाशोध केली असता दोघेही बोगद्याच्या आत कोसळ्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दोघांनाही वाचवण्यात अपयश आलं आहे.
दरम्यान, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पामध्ये नदीचे खोरे जोडणे, अनेक उपसा सिंचन प्रकल्प आणि धाराशिव आणि बीड जिल्ह्यांसह मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणे यांचा समावेश आहे.