पुणे : इस्लामिक स्टेट्स ऑफ बांग्लादेश या दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका भारतीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शरियत मंडल असं त्याचं नाव आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केलीय. त्याला पुणयातील चाकणमधून अटक करण्यात आलीय. पुलवामा हल्ल्य़ाशी त्याचा संबंध असल्याचा संशय आहे. बांग्लादेशी दहशतवादी संघटनेसाठी तरूणांची भरती करण्यात तो सहभागी अशी प्राथमिक माहिती आहे. त्याच्याकडून काही महत्वाची कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. बिहार एटीएसने याआधी दोघांना पाटण्यातून अटक केली आहे. ही कारवाई त्याच तपासाचा भाग आहे. अटक केल्यानंतर आरोपीला पुणे न्यायालयात प्रवासी पोलीस कोठडी मिळावी यासाठी हजर करण्यात आले होतं. ती मंजूर झाल्यानंतर त्याला बिहारला नेण्यात आले.
बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुणे एटीएसच्या सहकार्याने बुधवारी ही कारवाई केली. बिहार दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील चाकण परिसरात कारवाई केली. अटक केलेला 19 वर्षीय तरुण मुळचा पश्चिम बंगालचा असून अन्वरुलहक मंडल असे त्याचे नाव आहे. चाकणमधील खलुंब्रे परिसरात बांधकाम कामगार म्हणून तो काम करत होता. त्याच्याकडे सैन्याबाबत माहिती, नकाशे आणि पुलवामा हल्ल्याबाबतचे इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.
बिहारमधील पाटणा रेल्वे स्टेशनबाहेर दोनच दिवसांपूर्वीच संशयितरित्या फिरणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे या बांग्लादेशी नागरिकांकडेही पुलवामा हल्ल्यासंदर्भात कागदपत्रे सापडली आहेत. मुळचे बांग्लादेशातील असणाऱ्या या दोघांची खैरूल मंडल आणि अबु सुलतान अशी नावे आहेत. ते जमात उल मुजाहिदीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट ऑफ बांग्लादेश या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनाचे सदस्य आहेत.
दरम्यान, जैश-ए-मोहमदने पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याची जोरदार मोहीम उघडली. तसेच पाकिस्तानमधील बालाकोटच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता.