Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जुन्या जमान्याचे आदर्श आहे असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर कोश्यारी यांना हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosle) यांनीदेखील राज्यपालांविरोधात एल्गार पुकारला आहे. उदयनराजे भोसले यांनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेत राज्यपालांवर टीका केली आहे. यानंतर आता राष्ट्रपतींनीं याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी पाठवलेल्या एका पत्राची दखल घेण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या उदयनराजे भोसले यांच्या मागणीच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंनी दखल घेतलीय. उदयनराजेंनी राष्ट्रपतींना यासंदर्भात पत्र लिहीले होते. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलंय. राष्ट्रपती कार्यालयाने उदयनराजेंना त्याबाबतची माहिती कळवलीय. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्यानंतर संतापलेल्या उदयनराजेंनी 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे राज्यपाल वक्तव्याच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती उदयनराजेंनी राष्ट्रपतींना केली होती. या पत्राची दखल घेत राष्ट्रपतींच्या त्यावरच्या अभिप्रायासह केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आलंय. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.