विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.
वाढतं प्रदूषण डोंबिवलीकरांसाठी चिंतेचा विषय ठरलंय. प्रदूषण नियामक मंडळ कितीही दावा करत असलं तरी डोंबिवलीमधील प्रदूषणाने उग्र स्वरूप धारण केल्याचा नागरिकंचा आरोप आहे. सध्या कारखान्यातून निघणाऱ्या घातक अशा वायू प्रदूषणाने डोंबिवलीकर हैराण झालेत. परिसरातल्या घरात काळ्या रंगाची धूळ साठत आहे.
दिवसातून दोन तीन वेळा सफाई केली तरी पुन्हा काजळीसारखी धूळ घरात साठते. शिवाय परिसरात नागरिकांना श्वसनाचे आजारही जडलेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाहीये. या काळ्या धुळीचा परिणाम झाडांवर सुद्धा होत असून परिसरातील झाडांच्या पानावर काळ्या रंगाचा थर साठत असून झाडांना धोका असल्याचं रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
डोंबिवलीत वारंवार अशा समस्या निर्माण होत आहेत. प्रशासन, एमआयडीसी, महापालिका यांच्याकडे वारंवार तक्रारीही करून झाल्या तरी कोणत्याही पातळीवर हालचाल होत नाही. त्यामुळे आता नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.