मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. दोन तासांच्या चौकशीनंतर पोलीस बाहेर पडले आहेत.
पोलीस पथक येथे दाखल होण्यापूर्वी फडणवीस यांनी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे सागर बंगल्याबाहेर हजर आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, 'देवेंद्र फडणवीस हे स्वतः वकील आहेत. त्यामुळे पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देतील ' असे सांगितले.
भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सागर बंगल्यावर पोलीस पथक दाखल झाले. पोलीस उपआयुक्त हेमराज सिंग राजपूत, सायबर सेलचे एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक चौकशीसाठी आले होते. या पथकाने देवेंद्र फडणवीसांच्या चौकशी केली. तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलीस फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर पडले.
देवेंद्र फडणवीस यांनी माहिती कुठून मिळाली याबद्धल चा प्रश्न टाळला, त्यांच्या अधिकारात असल्याने आणि केंद्रीय तपास यंत्रणेला कळवले असल्याचे उत्तर दिले. असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांच्या चौकशीमुळे फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. काही वेळात प्रदेश भाजपच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यावेळी चौकशीत काय विचारण्यात आले याबाबत सविस्तर माहिती मिळू शकणार आहे.