अजितदादा आहेत कुठे?- पिंपरी-चिंचवडकरांना प्रश्न

पिंपरी-चिंचवडकरांना पडला प्रश्न 

Updated: Sep 20, 2019, 09:23 PM IST
अजितदादा आहेत कुठे?- पिंपरी-चिंचवडकरांना प्रश्न title=

पिंपरी-चिंचवड : शरद पवार राज्यभर दौरे करत असताना दादा कुठे आहेत असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शहरात तळ ठोकून बसलेले अजित पवार आता शहराकडे फिरकलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत दस्तरखुदद्द पुत्र पार्थ पवारच मावळच्या रिंगणात असल्यानं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरात तळ ठोकला होता. प्रत्येकाला जातीनं फोन करणं, गाठी भेटी घेणं हे त्यांनी कटाक्षानं पाळलं. पार्थ पवारही मंदिरांना भेटी, भजनामध्ये टाळ कुटणं, चर्चमध्ये जाणं असे कार्यक्रम करताना दिसले. मात्र पार्थ पवारांच्या दारूण पराभवानंतर या दोघांनीही शहराकडे पाठ फिरवली. 

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असली तरी शहराला मान्य होईल असा मोठा नेता भाजपकडे नाही. आजही शहरावर अजित पवारांचा प्रभाव आहे. त्यामुळे राज्यभरात अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या राष्ट्रवादीला शहरात एखाद्या ठिकाणी तर यश मिळण्याची शक्यता आहे.. पण अजितदादा गायब आहेत. शहरातले नेते मात्र त्यांचं शहरावर लक्ष असल्याचं सांगत आहेत.

दुसरीकडे भाजपनं राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे. आम्ही एवढे चांगले काम करू की अजित पवार आणि पार्थ पवार यांना शहरात येण्याची गरजच राहणार नाही असा टोला लगावला आहे.

पिंपरी चिंचवडच नव्हे, तर राज्यात अनेक भागात राष्ट्रवादीचे नेते क्षीण झाले आहेत. त्यांना गरज आहे मोठ्या नेत्यांच्या आधाराची... पण नेमके तेच होताना दिसत नाही आहे.