बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार! '100 वर्ष शरद पवारांनाच संधी द्यायची तर मग इतरांना...' अजित पवारांचा मतदारांना सवाल

बारामतीत शरद पवारांनाच संधी देणार असाल तर आम्ही काय करायचं असा सवाल अजित पवारांनी बारामतीकरांना केलाय.. येवढचं नाही तर घराणेशाहीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलाय. काय म्हणाले अजित पवार बारामतीकरांना पाहुयात.

नेहा चौधरी | Updated: Nov 17, 2024, 09:01 PM IST
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार! '100 वर्ष शरद पवारांनाच संधी द्यायची तर मग इतरांना...' अजित पवारांचा मतदारांना सवाल  title=

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष बारामतीकडे लागलंय. कारण बारामतीत पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगतोय. लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय सामना रंगला होता. त्यात नणंद सुप्रिया सुळे यांनी वहिनी सुमित्रा पवार यांचा पराभव केला होता. अजित पवारांना बारामतीकरांनी दणका दिलाय. त्यामुळे आता दादा बारामतीत गावागावात सभा आणि प्रचार करताहेत. माळेगावातील सभेतून तर दादांनी शरद पवारांवर घराणेशाहीवरून थेट निशाणा साधलाय. 100 वर्ष शरद पवारांनाच संधी द्यायची तर मग इतरांना काय करायचं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय.

निवडून येणाऱ्यामध्ये कर्तृत्व लागतं. कामाची धमक असावी लागते. एकच घराणं आहे म्हणून निवडून देण्यात काय अर्थ असा सवालही त्यांनी या सभेत उपस्थित केलाय. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाकारून बारामतीकरांनी शरद पवारांच्या तुतारीला पसंती दिली होती. लोकसभेतील पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी दादा सतर्क झालेत. त्यामुळे अजित पवार बारामतीतील गावचं गावं पिंजून काढताहेत. गावात सभा घेऊन साहेबांना संधी दिली आता मला संधी देण्याचं आवाहन बारामतीकरांना करताहेत. 

 बारामतीत सर्वत्र भावनिक लाट दिसत असून, विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांच्या ओठांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव असले, तरी पोटी मात्र शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. आता या कौटुंबिक लढाईत अजित पवार यांचा विकासाचा मुद्दा लोकांना भावतो की शरद पवार यांचे भावनिक आवाहन भावते हे निवडणूक निकालातून दिसून येईल. त्यामुळे बारामतीकरांचा कौल युगेंद्र पवारांना की अजित पवारांना हे येत्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.