हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघरच्या केळवे (Kelwe, Palghar) भागात एक अनोखी घटना समोर आली आहे. साठ वर्षांच्या प्रतीक्षा तांडेल आणि बँकेतून निवृत्त झालेले त्यांचे पती ठकसेन तांडेल हे केळव्यातल्या मांगेला वाडीत राहातात. गेल्या 31 मे रोजी त्यांच्या घरी चोरी झाली. जेवणानंतर शतपावलीसाठी समुद्रावर गेले असताना चोरांनी डल्ला मारला.. घरातलं तब्बल 15 तोळं सोनं (Gold) चोरट्याने लंपास केलं. त्यामुळं या वृद्ध दाम्पत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. आयुष्यभराची कमाई अवघ्या 20 मिनिटांत नाहीशी झाली. कुणीतरी जवळच्या व्यक्तीने ही चोरी केली असावी आसा पोलिसांना संशय होता.
याप्रकरणी केळवे पोलिसांनी (Kelwa Police) तपास सुरू केला. चोरी करणारा कुणीतरी जवळचाच असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यांना परिसरातल्या नागरिकांना एकत्र बोलावून भावनिक साद घातली. काहीही झालं तरी कोळी समाजाचे लोक चोरी करणार नाहीत. चोरीचा कलंक लावून घेऊ नका, असं आवाहन पोलिसांनी केलं. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. अवघ्या तीनच दिवसांत प्रतीक्षा तांडेल यांचे भाऊ विश्वनाथ तांडेल यांच्या घराच्या व्हरंड्यात रात्रीच्या सुमारास चोरट्यानं सोनं आणून ठेवलं. सोबत एक चिठ्ठीही होती.
दयावान चोराचा 'माफी'नामा
चोरट्याने चिठ्ठीत एक मजकूल लिहिला होता. माझ्याकडून अनवधानानं ही चूक घडली असून मला माफ करा. मी चोरलेलं सोन समुद्रकिनाऱ्यालगत गाडून ठेवलं. त्यातील एक कॉइन गहाळ झाला आहे. त्यामुळं मला माफ करा, असं चोरानं चिठ्ठीत प्रामाणिकपणं लिहिलं होतं. चोरी झालेलं सोनं परत मिळेल, याची तांडेल दाम्पत्याला अजिबातच आशा नव्हती. मात्र सोनं परत मिळाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले.पालघरच्या केळवे भागात आता चर्चा आहे ती याच प्रामाणिक चोराची. चोरालाही काळीज असतं, हेच या घटनेनं दाखवून दिलंय.
मध्यप्रदेशातही अशीच घटना
काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्येही अशीच घटना समोर आली होती. एका चोरट्याने जैन मंदिरात चोरी केली. चोरीच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांत तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण यादरम्यान चोरट्याने स्वत: सगळं सामान आणून गुपचूप मंदिरात ठेवून दिलं. सोबत त्याने एक चिठ्ठीही लिहली. त्याने देवाची माफी मागितली, 'देवा मला माफ कर, मी चोरीचं सामान परत करत आहे', असं चोरट्याने चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ही चिट्ठी लिहिणारा चोर कोण होता, हे मात्र कळू शकलेलं नाही.