धक्कादायक! पैसे दिले नाहीत म्हणून तृतीपंथीयांचा धिंगाणा, घरात घुसून टीव्ही, फ्रिजची तोडफोड

नाशिकमध्ये टोलनाक्यावर पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीयांनी प्रवाशांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमधली घटना समोर आली आहे 

Updated: Aug 18, 2021, 05:17 PM IST
धक्कादायक! पैसे दिले नाहीत म्हणून तृतीपंथीयांचा धिंगाणा, घरात घुसून टीव्ही, फ्रिजची तोडफोड title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : केवळ पैसे दिले नाहीत म्हणून थेट घरात घुसून तृतीयपंथीयांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. तृतीयपंथीयांनी घरातील टीव्ही, फ्रीजसारख्या महागड्या वस्तूंची तोडफोड केली, इतकंच नाही तर त्यांनी घरातील काहीजणांना मारहाणही केली. 

नेमकी घटना काय?

नागपूरच्या हिंगणा परिसरातील नीलडोह गावात श्रावण महिना असल्याचं निमित्त सांगून तीन-चार तृतीयपंथीयांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. यावेळी अंकुश मुनेश्वर यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरुन तृतीयपंथीयांनी अंकुशशी हुज्जत घातली. वादावादीनंतर तृतीयपंथी तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी 15 ते 20 तृतीयपंथी रिक्षाने अंकुशच्या घरी दाखल झाले आणि शिवीगाळ करत घरात घुसले. 

घरात घुसून तृतीयपंथीयांनी घरातील टीव्हि, फ्रीज व इतर वस्तूंची तोडफोड केली. तसंच अंकुश आणि त्याच्या 57 वर्षीय आईला मारहाण केल्याचा आरोप अंकुश मुनेश्वर यांनी केला आहे. हा सगळा प्रकार पाहून गावकरी जमा झाले आणि त्यांना तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 

एमआयडीसी प्रभारी ठाणेदार उमेश बेसरकर पथकासह घटनास्थळी पोहचले आणि सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात पोलीस ठाण्यात आणलं. तोडफोड आणि धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.