सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सासूने केलेल्या अपमानामुळे जावयाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याचा प्रकार नाशिकच्या (Nashik Crime News) देवळाली भागात घडला आहे. सासूच्या कृत्याने अपमान झाल्याने जावयाने घरी जात गळफास लावून घेतला आणि आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी आता सासू आणि पत्नीच्या दोन भावांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड वर्षापूर्वीच झालं होतं लग्न
नितीन चटोले हा आपली पत्नी आणि मुलांसोबत देवळाली येथील वडारवाडी गावात राहत होता. वडनेर गेट परिसरात राहणाऱ्या विमल बीडलान यांच्या मुलीसोबत नितीन चटोलेचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. गेली दीड वर्षे सातत्याने नितीन आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होते. याच रागातून पत्नी माहेरी निघून गेली होती. यानंतर नितीन नैराश्यात गेला.
सासूची जावयाविरोधात तक्रार
पती पत्नीच्या वादाला गुरुवारी वेगळं वळण लागलं. नितीन आणि पत्नीच्या वादात सासू विमल यांनी हस्तक्षेप केला. याच कारणावरुन दोघांमध्ये मोठं भांडण झाले. यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं. सासूने नितीन विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यांनतर देवळाली गाव येथील सुंदर नगर पोलीस चौकीत सासूने नितीनला सर्वांसमोर पत्नीच्या पाया पडण्यास सांगितले. यानंतर नितीन पत्नीच्या पाया पडला.
घरी पोहोचताच घेतला गळफास
यानंतर नितीन घरी निघून गेला. सासूने सर्वाच्या समोर पत्नीच्या पाया पडायला लावल्यामुळे नितीन निराश झाला होता. अपमानीत झालेल्या नितीनने घरी येऊन गळफास घेत आपले जीवन संपवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची माहिती घेऊन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत नितीनची सासू विमल बीडलान ,मेहुणे विकी आणि राहुल यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..