अमर काणे, झी मीडिया, नागपूर : डॉक्टर म्हणजे आपण देवाचं दुसरं रुप मानतो. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर (Doctor) अंतिम क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करतो. 24 तास 12 महिने रुग्णाच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतलेला माणूस म्हणजे डॉक्टर. त्यामुळे डॉक्टरांबद्दल प्रत्येकाच्या मनात नेहमीच आदर असतो. पण याला काही डॉक्टर अपवाद असतात. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी अशीच एक घटना नागपूरमध्ये (Nagpur) उघडकीस आली आहे. चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडली. ही धक्कादायक तितकीच संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा अंतर्गत खात इथल्या आरोग्य केंद्रावर घडली आहे.
खात इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर शुक्रवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आठ महिलांना बोलविण्यात आलं होतं. आरोग्य केंद्रावर उपस्थित असलेल्या डॉक्टर भलावी यांनी सुरुवातीला चार ऑपरेशन केली. या दरम्यान त्यांनी चहा मागवला. तोपर्यंत त्यांनी आणखी चार महिलांना शस्त्रक्रियेसाठी भूल इंजेक्शन दिलं. पण चहा वेळेवर न मिळालेल्या संतापलेले डॉक्टर भलावी यांनी चक्क ऑपरेशन सोडूनच निघून गेले. हा प्रकार लक्षात येताच आरोग्य केंद्रावर एकच खळबळ उडाली. भूल दिलेल्या महिला त्याच अवस्थेत बेडवर पडून होत्या. त्यानंतर आरोग्य केंद्रावर दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी घेतली.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी घेतली.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. यात वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण राऊत आणि नागूपर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी बुटे यांचा समावेश आहे.
डॉ. भलावी यांनी नियोजनानुसार पहिल्या चार शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर त्यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकंडे चहा मागितला. पण चहा वेळेत न मिळाल्याने डॉ. भलावी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून काढता पाय घेतला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपू जिल्हा परिषद उपाध्यक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.