मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपनं वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यात विलास चव्हाण आणि अरुण राठोड सापडत नसल्यानं या प्रकरणातलं गूढ आणखी वाढलं आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राठोडांची मंत्रिपदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे..
पूजाच्या मोबाईलवर राठोडांचे 45 मिस्ड कॉल्स?
टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत आले आहेत. कारण ज्यादिवशी पूजाचा मृत्यू झाला, त्यादिवशी तिच्या मोबाईलवर संजय राठोड नावानं 45 मिस्ड कॉल आले होते, असा खळबळजनक आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय...
विलास चव्हाण, अरुण राठोड आहेत तरी कुठे?
त्यात पूजाच्या मृत्यूला 18 दिवस उलटले तरी तिचा चुलत भाऊ विलास चव्हाण आणि त्याचा मित्र अरुण राठोड हे दोन महत्त्वाचे साक्षीदार गायब आहेत.. पूजाच्या मृत्यूनंतर ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या त्यात या दोघांचे आवाज असल्याचं सांगितलं जातंय... त्या दोघांचा थांगपत्ता पोलिसांनाही लागत नसल्यानं मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय.. त्यात अरुणच्या बीडच्या घरात चोरी झाली... त्यामुळं या प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे नष्ट तर केले जात नाहीत ना, असे एक ना अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित होतायत...
मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे... ठाकरेंनी बजावलं?
पूजाच्या मृत्यूचं गूढ अजून उकललेलं नसताना, दुसरीकडं वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतो आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राठोड राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोडांना बजावल्याचं समजतं आहे.
केवळ विरोधकांचाच नव्हे तर राठोडांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांचा देखील दबाव असल्याचं समजतं आहे. राठोड प्रकरणात शिवसेनेची आणि मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. बजेट अधिवेशनात विरोधकांच्या हातात हे आयतं कोलीत मिळू नये, यासाठी उद्धव ठाकरे काय करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.