Rohit Pawar On Vidhansabha Election : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यातील घडामोडींना (Maharastra Politics) वेग आला आहे. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवल्यामुळे आता आमदारांची नाराजी स्पष्ट दिसत आहे. अशातच आता महायुतीमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाल्याचं दिसून येतंय. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बैठक झाली. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला पुन्हा शिंगावर घेतलंय.
काय म्हणाले रोहित पवार?
ईडीच्या माध्यमातून केलेल्या राजकारणाचा भाजपला सर्वाधिक फटका बसला. दोषींवर कारवाई केलीच पाहिजे, परंतु भाजपने दोषींना वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतले हे सर्वसामान्य जनतेला आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाही पटलं नाही. हेच लोकसभेच्या निकालात दिसून आलं, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
सत्तास्थापनेच्या तडजोडीत जनमताने दिलेला ठसका विसरून ज्यांना जनतेनेही नाकारलं अशांना क्लीनचीट दिली जात असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हीच जनता ‘मिर्च्यां’चा धूर देऊन भाजपच्या नाकी नऊ आणल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित, असा इशारा रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे.
धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 5, 2024
अहंकारात आणि व्यक्तिपुजेत बुडालेल्या भाजपला जनतेने यंदा आरसा दाखवणारा कौल दिला म्हणूनच नाईलाजाने का असेना भाजप नेते आता “मोदी सरकार” ऐवजी “एनडीए सरकार” म्हणत आहे, अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे. धाडस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं, असं रोहित पवार यांनी लोकसभेच्या निकालानंतर म्हटलं होतं.