Maharashtra Weather Forecast Today: राज्यात सुरु असणाऱ्या उष्णतेच्या लाटेनं हाहाकार माजवलेला असतानाच पावसाचे ढग आले आणि एकाएकी तापमानात काही अंशांनी घट नोंदवण्यात आली. राज्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच अवकाळीचे ढग परतले आणि पाहता पाहता विदर्भ, मराठलाडा आणि मध्य महाराष्ट्र वगळता कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाळी वातावरण पाहायला मिळालं. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि उपनगरांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरणासोबतच सोसाट्याचा वाराही सुटला होता. (maharashtra weather todays Forecast Mumbai and state Unseasonal Rain predictions latest update )
दरम्यान, या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यातील हवामानाची परिस्थिती अशीच राहणार असून, 5 मे पर्यंत ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित भागात येत्या चार दिवसांमध्ये कमाल तापमानात घट नोंदवण्यात येईल. मागील आठवड्यामध्ये हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील कमाल तापमानात 2 ते 4 अंशांनी घट नोंदवण्यात आली होती. तर, काही भागांना मात्र अवकाळीनं पुन्हा एकदा झोडपून काढलं.
अवकाळी पवसामुळे नांदेड जिल्ह्यात शेतीसह घरांचं नुकसान झालं. तर, वाशीम जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीच आणि पावसामुळे पपई, मूग, हळद, टोमॅटो पिकांसह फळबागांचं नुकसान झालं. तिथे जळगावच्या जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतीचं मोठे नुकसान झालं. तर, काही भागांमध्ये घरांवरील पत्रेही उडून गेल्यामुळं अनेक कुटुंबांपुढं संकट उभं राहिलं.
पाकिस्तानचा उत्तर भाग आणि त्यालगतच असणाऱ्या राजस्थानच्या पश्चिम भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळसदृश परिस्थितीमुळं उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि छत्तीसगढच्या दक्षिण भागाला पावसाचा तडाखा सहन करावा लागू शकतो. शिवाय येत्या 24 तासांत लक्षद्वीप, तामिळनाडू, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. तिथं काश्मीर आणि स्पितीच्या खोऱ्यात थंडीचा कडाका वाढून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यातही पावसाची रिमझिम पाहता या अवकाळीचा मान्सूनवर काय परिणाम होणार याकडेच सर्वांच्या नजरा आहेत. सध्याच्या घडीला या अवकाळीचा मान्सूनवर थेट परिणाम होणार नसून, देशात यंदा सर्वसाधारण मान्सून असेल हाच अंदाज हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळं तूर्तास चिंता नाही.
महाराष्ट्रात अवकाळीची हजेरी असतानाच तिथं राजस्थानमध्येही संपूर्ण आठवड्यात पाऊस बसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. थेट 8 मे नंतरच इथली परिस्थिती पूर्णपणे बदलेल. तर, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) हवामानाची परिस्थिती पाहता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इथं साधारण 40 ते 50 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार असून पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. बदलणाऱ्या या हवामानाचे थेट परिणाम चारधाम यात्रेवर (Chardham Yatra) आणि एकंदरच मे महिन्यातील पर्यटनावर होताना दिसत आहेत. त्यामुळं या दरम्यानच्या काळात तुम्हीही पर्यटनाच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल, तर हवामानाचा अंदाज विचारात घ्या!