Maharashtra Weather News : परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसानं महाराष्ट्रासह केरळ आणि कर्नाटकात थैमान घातलं. आता मात्र हाच पाऊस विश्रांती घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरमार असून, उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या हवेच्या चक्रीय स्थितीमुळं उत्तर बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागातून मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पवासाचा यलो अलर्ट लागू असेल. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळेल. अधुनमधून येणाऱ्य़ा पावसाच्या सरी वगळता इथंही आकाश निरभ्र असेल. गुजरातच्या दक्षिणेपासून बिहारच्या वायव्येपर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असणार आहे. ज्यामुळं राज्यात उष्णतेचा दाह बहुतांशी कमी झाला आहे.
यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा आधीच राज्यात दाखल झालेल्या मान्सूनचा मुक्काम काहीसा जास्तच असल्याचं पाहायला मिळत असून, मान्सूनच्या परतीचा मुहूर्तही लांबणीवर पडला असून, त्याच्या वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचं चित्र आहे. मान्सूननं सध्या राजस्थान आणि कच्छ येथून परतीचा प्रवास सुरू केला. ज्यानंतर पंजाब आणि हरियाणातूनही त्यानं माघार घेतली. पण, पुढं मात्र हा परतीचा प्रवास अडखळताना दिसला, ज्यामुळं देशभरात हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यातून मान्सूननं माघार घेण्यास सुरुवात केली असली तरीही देशभरात मात्र अद्यापही मान्सून काढता पाय घेताना दिसत नाहीय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून दिल्लीमध्ये पूरसदृश्य परिस्थितीचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. उत्तराखंड आणि काश्मीरसह हिमाचलमध्येही काही भागांमध्ये हवामानात सातत्यानं बदल होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळं या विचित्र हवामानामुळं सध्या सगळेच बुचकळ्यात पडल्याचं स्पष्ट होत आहे.