Maharashtra Rain : तिथं देशातून (Monsoon) मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असताना इथं महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांमध्ये पाऊस परतीची वाट धरताना दिसणार आहे. पण, तत्पूर्वी राज्यातील बहुतांश भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बळीराजासाठी ही चांगली बातमी असून, राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशय क्षेत्रांमध्येसुद्धा पाणीपातळी समाधानकारक असल्यामुळं यंत्रणांवरील ताणही कमी होताना दिसणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकण (Konkan) आणि विदर्भात (Vidarbha) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईत तुलनेनं हवामान दमट राहणार असून, सकाळ आणि दुपारच्या वेळी उष्णतेचा दाह अधिक तीव्र जाणवणार आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मात्र अंशत: ढगाळ वातावरण दिसेल.
सध्या दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंडमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधूनही मान्सूननं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार आहे.
IMD च्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. तर उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणांवर पावसाची रिमझिम असू शकते. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवलं जाऊ शकतं. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुळं हवामानाचं एकंदर रुपडं पालटणार आहे.