Maharashtra Rain : मोठ्या सुट्टीवर गेलेल्या मोसमी पावसाची सुट्टी आता टप्प्याटप्प्यानं संपताना दिसत असून, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या सुरुवातीपासून त्यानं राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विजर्भात विजांच्या क़कडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची संततधार पाहायला मिळले. किंबहुना काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं पाऊस नाही, असं म्हणत जर छ्त्र्या रेनकोट दडवून ठेवले असतील तर ते आताच बाहेर काढा. कारण, पाऊस परतलाय असं म्हणायला आता हरकत नाही.
मागील काही दिवसांमध्ये पावसानं राज्यात उघडीप दिली आणि अचानकच तापमानाच लक्षणीय वाढ झाली. उन्हाळ्यात सूर्याचा दाह जाणवतो तितक्या उष्णतेमुळं नागरिक होरपळून निघाले. तर, वातारणातील या बदलामुळं अनेकांची प्रकृतीसुद्धा डगमगली. साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली.
दरम्यान, येत्या काही दिवसांत पाऊस परतणार असून, त्यापूर्वी पुढल्या 24 तासांसाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि सातारा या भागांमध्ये यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये ताशी 40 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचाही इशारा हवामान विभागानं दिला आहे.