Maharashtra Winter Session 2022 : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार असा इशारा देत हिवाळी अधिवेशवादरम्यान नागपूरमध्ये (Nagpur) राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज केलेलं ट्विट चांगलच चर्चेत आहे. दिशा सालियनप्रकरणी (Disha Salian) सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टार्गेट केल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नेत्यांची फौजच नागपूरात दाखल होणर आहे.
काय आहे संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये
संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत सुतळी बॉम्ब दाखवण्यात आला असून त्याला मोठी अगरबत्ती बांधण्यात आली आहे. या फोटोबरोबर जय महाराष्ट्र, शुभ प्रभात असं लिहिण्यात आलं आहे. नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितल्याने संजय राऊत यांच्या ट्वीटला महत्त्व प्राप्त झालं आहे.
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात pic.twitter.com/ugyt0vctys— Sanjay Raut (@rautsanjay61) December 26, 2022
ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार आहेत
ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांच्या फायली तयार असून त्यांनाही जेलमध्ये टाकणार असही संजय राऊत म्हणाले. आम्ही पाठीमागून नव्हे समोरून वार करणारे आहोत असा इशाराच राऊतांनी शिंदे गट आणि भाजपला दिला आहे. आज रात्री आदित्य ठाकरे,संजय राऊत, वरूण सरदेसाई नागपुरात पोहचतील.
उद्धव ठाकरेंचा पेन ड्राईव्ह बॉम्ब
दरम्यान, कर्नाटक सीमावादप्रकरणी (Maharashtra-Karnataka Border Dispute) उद्धव ठाकरे आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले.. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत थेट पेन ड्राईव्हच सादर केला. सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली. सीमाप्रश्नावर शिंदेंनी जेव्हा लाठ्या खाल्ल्या तेव्हा ते शिवसेनेत होते. पण आता ते सीमापार भाजपात असून कर्नाटक वादावर चकार शब्दसुद्धा काढत नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली. उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत आक्रमकरित्या सीमाप्रश्न मांडला. विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरूवात केल्यावर उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. लढा दोन भाषांचा नाहीये तर हा माणुसकीचा लढा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. या लढ्यात केंद्र सरकार न्यायाची भूमिका घेणार आहे का असा सवाल त्यांनी केला.