Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked: भाजप नेते निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण येथे घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर निलेश राणे यांनी गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलही बोलले. निलेश राणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू, असेही ते पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार निलेश राणे यांची सभा आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
लांबून काय दगड मारतो समोर ये. सरळमार्गाने आम्ही जात होतो. हा पोलिसांच्या मागे. पोपटी रंगाचे शर्ट घातला होता. आधी पोलिसांच्या गराड्याच्या मागे. नंतर महिलांच्या मागे. दोन-चार दगड मारले असतील. आता दगडींच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवणारेय हे लक्षात ठेव बघ...तू नख लावलयस आम्हाला...मोजून शंभर लोक होते, असे निलेश राणे आपल्या सभेत म्हणाले. तुला शेजारी बसवायला बाळासाहेबांचे वाईट दिवस नव्हते. नारायण राणेंनी बाळासाहेबांवर इतकं प्रेम केलं त्याच्या 25 टक्के प्रेमही तू केलं नसशील, असे ते भास्कर जाधवांना म्हणाले. आमच्या शेपटीवर पाय ठेवलास. या जन्मात तुला विसरणार नाही असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांची चिपळूणची भाईगिरी याच निलेश राणेंनी संपवली होती, असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांचा एक दिवस भंगार नक्की करणार, असेही ते यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यात वागळेंच्या गाडीची मागची काच फोडण्यात आली होती. हे कृत्य भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे असल्याचा आरोप वागळेंनी केला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावरही भाष्य केले. ज्यांना कुणीच ऐकत नाही अशा लोकांना मोठं का करता? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. हे भाजपचं कल्चर मुळीच नाहीय, असे ते म्हणाले. त्यांनी ज्या प्रकारचे शब्द पंतप्रधान मोदी आणि ज्येष्ठ नेते अडवाणी यांच्याबद्दल वापरले हे शोभनीय नसल्याचे फडणवीस म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांना माझा नेहमीच सांगणं की, कायदा हातात घेऊ नका, विनाकारण कुणालाही मोठं करू नका, असे ते यावेळी म्हणाले.