'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला

Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. 

Updated: Mar 20, 2024, 08:03 PM IST
'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला title=

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक :  अजित पवार काही आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पक्षावर दावा केला. अजित पवारांच्या भूमिकेवर (Ajit Pawar) त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी टीका केली. यावर छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी ठाकरे कुटुंबियांचे उदाहरण देत सल्ला दिला आहे. अजित दादांना विरोध करायचा असेल तर करा मात्र भाषेवर मात्र नियंत्रण ठेवा. अखेर रक्ताची नाती तुटत नाह, असा सल्ला छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबियांना दिला आहे. 

श्रीनिवास पवारांची यांची अजित पवारांवर टीका 
शरद पवार यांनी अजित पवारांना पंचवीस वर्षे मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचं! पुढच्या काही वर्षांत दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून 83 वर्ष वय झालेल्या शरद पवारांची (Sharad Pawar)साथ सोडणे. हे मला पटले नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती. 

भुजबळ यांचा सल्ला 
श्रिनिवास पवार यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. अजित दादांचे सर्व नातेवाईक अजित दादांच्या विरोधात उभे आहेत. माझं एवढच म्हणणं आहे सर्वाना, तुम्हाला विरोध करायचा आहे करा, कोणीतरी उभं राहतं तर कोणीतरी विरोध करतो. विरोध करा मात्र भाषेवर थोड नियंत्रण ठेवलं तर बर होईल. शेवटी राजकारणात तुम्ही एकमेकांचे विरोधक आहात. मात्र तुमचं रक्ताचं नातं तुटत नाही. आज ना उद्या तुम्हाला कुटुंब म्हणून कुठल्यातरी कार्यक्रमात एकत्र यायचं आहे. चर्चा करावी लागणार आहे. एकमेकांच तोंड बघावंच लागणार आहे. यामुळे रक्ताची नाती तुटत नाही. रक्ताची नाती आहेत हे लक्षात ठेवून वक्तव्य केली पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.     

ठाकरे कुटुंबियांच दिली उदाहरण 
श्रीनिवास पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या वादाबाबत छगन भुजबळ यांना विचारणा केली असता त्यांनी ठाकरे कुटुंबियांचं उदाहरण दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय वाद आहेत. तरी उद्धव ठाकरे यांना कधी अडचण झाली तर राज ठाकरे धावून जातात. कधी राज ठकारे यांना अडचण आली तर उद्धव ठाकरे हे धावून जातात. हि सर्व रक्ताची नाती असतात. हि कधी तुटत नाही असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.