निखील चौकर, झी मीडिया, अहमदनगर : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं. मात्र अहमदनगरमध्ये एका महाभागानं स्वतःच्या आईला जिवंतपणीच स्मशानभूमीत पोहोचवलं आहे.
या आहेत लक्ष्मीबाई आहुजा. अहमदनगरमधील अमरधाम स्मशानभूमीत त्या गेल्या सहा महिन्यांपासून रहतात.
दशक्रियाविधीनंतर ठेवलेल्या जेवणावर दिवस काढतात. त्यांच्यावर ही वेळ आणलीये पोटच्या पोरानं, पत्नीशी पटत नाही म्हणून पोरानं या वृद्ध मातेला जीवंतपणीच स्माशानभूमीत आणून ठेवलं आहे.
तळहाताच्या फोडाप्रमाणे पोराला जपलं, म्हातारपणी पोरगा आपल्याला आधार देईल असं स्वप्न उराशी बाळगलं.. मात्र पोरगा कपाळकरंटा निघाला.
आज ही माऊली दशक्रिया विधीनंतरच्या जेवणावळीवर जगतेय. कधीतरी पोराला सुबुद्धी येईल आणि तो आपल्याला इथून घेऊन जाईल या एकाच आशेवर.
मात्र ती आशाही पोरानं फोल ठरवली. अखेर नगरच्या माऊली प्रतिष्ठान संस्तेनं या माऊलीला आपलंसं केलंय.. मात्र अशा पाषाण हृदयी मुलावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.