कोल्हापूर राड्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे कॉलेज विद्यार्थी

व्हॉट्सअॅपला आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापूरात काल दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतलं आहे.

प्रताप नाईक | Updated: Jun 8, 2023, 02:32 PM IST
कोल्हापूर राड्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे कॉलेज विद्यार्थी  title=

Kolhapur : कोल्हापूरात झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आलीय. त्यातील 3 जण अल्पवयीन आहेत. तर एकूण 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयत. आक्षेपार्ह स्टेटस (objectionable status) ठेवणारे हे कॉलेज विद्यार्थी (College Student) असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यांना ताब्यात घेतलं असून, आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांना कुठून मिळाला? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. कोल्हापुरात (Kolhapur) सध्या शांतता असून, पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेयत. तसंच कोल्हापुरातील इंटरनेटसेवा रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलीय...

'महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही'
कोल्हापूर राड्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय. कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही...महाराष्ट्र प्रिय राज्य आहे, सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्याची आपली प्रवृत्ती नाही...सर्व सामान्य जनतेनं शांतता राखायला हवी, असं आवाहन पवारांनी केलंय. कुणीतरी जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे, याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केलं तर ही परिस्थिती तातडीने बंद झालेली दिसून येईल, असं पवार यांनी म्हटंलय. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे, असं आवाहनही पवारांनी केलं आहे. 

संजय राऊत यांची टीका
कोल्हापुरात काल झालेल्या घटनेत 60 टक्के लोक बाहेरचे असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच असे प्रकार कोण घडवतंय ते शोधावं असं आव्हानही दिलंय.

व्हॉट्सअॅप स्टेटसमुळेवाद
कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे फोटो ठेवले होता. यावर हिंदुत्वावादी संघटनांनी आक्षेप घेत त्या तरुणांच्या अटकेची मागणी करत कोल्हापूर बंदची हाक दिली. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले. या विरोधात ते मोर्चा काढणार होते, पण पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी मग पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. 

कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. दोन तासांच्या गदारोळानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अफवा पसरू नये यासाठी कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा काल संध्याकाळपासून आज रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.